आ. अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयाला महायुतीचे उमेदवार सिरसाट यांची भेट

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी आज सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय, शिवसेना भवन येथे सदिच्छा भेट देऊन निवडणूक प्रचाराबाबत चर्चा केली. 

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते सुहास शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, निवडणूक रणनीती तसेच मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. मतदारांनी मतदान करताना आपले मत बाद होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी तसेच मतदान प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रत्येक मतदान महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. 

यावेळी उमेदवार सुहास शिरसाठ यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देत प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले.